जयंत पाटील यांना सांगलीत राजकीय धक्का; राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक भाजपच्या गळाला

    20-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

सांगली : सांगली महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)ला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड आणि नगरसेवक सुरेश बंडगर यांनी मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला.

महापालिका निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांतच राष्ट्रवादीच्या गटात फूट पडल्याने आमदार जयंत पाटील यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. तीन नगरसेवकांच्या बळावर असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार गट)कडे आता केवळ एकच नगरसेवक उरला आहे.

महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. काँग्रेसला १८ जागा, तर राष्ट्रवादीला ३ जागांवर विजय मिळाला होता. त्यात युवराज गायकवाड, सुरेश बंडगर आणि अभिजित कोळी यांचा समावेश होता.

गेल्या काही दिवसांपासून गायकवाड आणि बंडगर भाजपच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. महापौर निवडीच्या वेळीही त्यांनी भाजपसोबत भूमिका घेतल्याची चर्चा होती. अखेर मंगळवारी त्यांनी अधिकृतरित्या भाजपमध्ये प्रवेश करत चर्चांना पूर्णविराम दिला.

दरम्यान, पक्षांतरबंदी कायद्याच्या पार्श्वभूमीवरही या घडामोडीकडे लक्ष लागले आहे. तीनपैकी दोन सदस्यांनी पक्ष बदलल्याने कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता कमी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

प्रभागातील रखडलेली पाणीपुरवठा, रस्ते आणि विकासकामे मार्गी लावण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे युवराज गायकवाड यांनी सांगितले. भाजप नेत्यांकडून विकासकामांचे आश्वासन मिळाल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.