विदर्भात उष्णतेचा कहर;अमरावती राज्यातील सर्वाधिक तापलेला जिल्हा, 46.8 अंशांवर पोहोचला पारा

    20-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : विदर्भात मे महिन्यातील उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून नागरिकांचे जगणे अक्षरशः असह्य झाले आहे. मंगळवारी अमरावती जिल्ह्याने यंदाच्या हंगामातील सर्व विक्रम मोडीत काढत तब्बल 46.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली. त्यामुळे अमरावती हा महाराष्ट्रातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला आहे.

अमरावतीसोबतच वर्धा आणि अकोला जिल्ह्यांनाही तीव्र उष्णतेचा फटका बसला आहे. वर्ध्यात 46.5 अंश सेल्सियस तर अकोल्यात 46 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे संपूर्ण विदर्भ सध्या भीषण ‘हीटवेव्ह’च्या विळख्यात सापडल्याचे चित्र आहे.

दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून अनेक शहरांमध्ये अघोषित कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिक अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळत आहेत. बाहेर पडताना चेहरा आणि डोके झाकूनच नागरिक प्रवास करताना दिसत आहेत.

नागपुरातही उष्णतेचा तडाखा-
नागपुरात मंगळवारी 45.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. गेल्या 24 तासांत तापमानात 1.1 अंशांची वाढ झाली असून हे तापमान सरासरीपेक्षा सुमारे दोन अंशांनी अधिक असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

रुग्णालयांत वाढली गर्दी-
सतत वाढणाऱ्या तापमानामुळे लू लागणे, डिहायड्रेशन, उलट्या-जुलाब यांसारख्या त्रासांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयांत उपचारासाठी येणाऱ्यांची संख्या वाढत असून प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

हवामान विभागाचा इशारा-
भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भावर निर्माण झालेल्या अँटी-सायक्लोनिक सर्क्युलेशनसह राजस्थानकडून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. पुढील 48 ते 72 तास विदर्भात ‘सीव्हियर हीटवेव्ह’ची स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

प्रशासनाने नागरिकांना भरपूर पाणी पिण्याचे, सूती कपडे वापरण्याचे तसेच दुपारच्या वेळेत शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.