नागपुरात उष्णतेचा कहर वाढला; उष्माघाताने 24 तासांत तिघांचा मृत्यू, तापमान 45.5 अंशांवर

    20-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून नागपुरातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. शहरातील तापमानाने 45.5 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला असून उष्माघातामुळे अवघ्या एका दिवसात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रचंड उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून दुपारच्या वेळेत शहरातील रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत.

हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील काही दिवस ‘हीट वेव्ह’चा इशारा जारी केला आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि गंभीर आजार असलेल्या नागरिकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उष्माघातापासून बचावासाठी भरपूर पाणी पिणे, हलके सूती कपडे वापरणे, डोक्यावर टोपी किंवा कापड ठेवणे तसेच उन्हात जास्त वेळ थांबणे टाळण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील रुग्णालये आणि आरोग्य यंत्रणाही सतर्क करण्यात आल्या आहेत.