भोर तालुक्यातील नरसापूर हादरले; चिमुकलीवरील अत्याचारानंतर ग्रामस्थांचा संताप उसळला

    02-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)
पुणे: जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर गावात चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. या प्रकरणी 65 वर्षीय आरोपीला पोलिसांनी तातडीने अटक केली असली तरी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुरडीला फूस लावून जनावरांच्या गोठ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करत मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेजही समोर आला असून आरोपी यापूर्वीही अशाच गुन्ह्यांमध्ये सामील असल्याची माहिती आहे.

या अमानुष कृत्यानंतर नरसापूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे. काल ग्रामस्थांनी रास्ता रोको करत निषेध व्यक्त केला होता, तर आज मोठ्या संख्येने गावकऱ्यांनी मोर्चा काढत आंदोलन छेडले. ग्रामपंचायत कार्यालयापासून पुणे–सातारा महामार्गापर्यंत निघालेल्या या मोर्चात महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांचा मोठा सहभाग होता.

“आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा अशा घटना थांबणार नाहीत,” अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

या गंभीर घटनेची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत पोलिसांना कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, ग्रामस्थ अद्याप संतप्त असून आरोपीवर कठोर कारवाई होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देत आहेत.