सुप्रीम कोर्टाचा निर्णय; ममता बॅनर्जींची याचिका फेटाळली, मतमोजणीबाबत EC चा निर्णय कायम

    02-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वादात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या प्रकरणात दिलासा मिळाला नसून न्यायालयाने निवडणूक आयोगाच्या भूमिकेला दुजोरा दिला आहे.

मतमोजणी प्रक्रियेसाठी केंद्रीय कर्मचारी आणि सार्वजनिक क्षेत्रातील (PSU) कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयाला विरोध करत ममता बॅनर्जी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने स्पष्ट शब्दांत सांगितले की, अशा नियुक्त्या नियमबाह्य नाहीत आणि त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही.

या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ममता बॅनर्जींच्या बाजूने युक्तिवाद मांडला. मात्र न्यायालयाने तो स्वीकारला नाही. न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोग आपल्या अधिकार क्षेत्रात काम करत असल्याचे नमूद करत याचिका फेटाळली.

याआधीही कलकत्ता उच्च न्यायालयात ममता बॅनर्जी यांना धक्का बसला होता. त्यामुळे मतमोजणी प्रक्रियेबाबत त्यांनी उभारलेला कायदेशीर लढा अपयशी ठरल्याचे चित्र आहे.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये २९४ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान पार पडले असून दुसऱ्या टप्प्याचे मतदान २९ एप्रिल रोजी पूर्ण झाले. आता ४ मे रोजी मतमोजणी होणार असून राज्यातील सत्तेचा कौल कोणाच्या बाजूने लागणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.