नसरापूर प्रकरणाने राज्य हादरले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची पीडित कुटुंबाला भेट, मुख्यमंत्र्यांना थेट फोन

    02-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

पुणे: जिल्ह्यातील नसरापूर येथे घडलेल्या चिमुकलीच्या निर्घृण हत्येनंतर परिसरात संतापाचे वातावरण कायम आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी धायरी येथील पीडित मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले.

या भेटीदरम्यान स्थानिक नागरिकांनी आरोपीवर तातडीने खटला चालवून कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. काही संतप्त नागरिकांनी आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणीही केली असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी उपस्थित असताना सुनेत्रा पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून नागरिकांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. यावर मुख्यमंत्र्यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत फास्ट ट्रॅक न्यायालयात सुनावणी करून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा दिली जाईल, असे आश्वासन दिले.

दरम्यान, पुणे ग्रामीण पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असून त्याला ७ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेनंतर राज्यभरातून संताप व्यक्त होत असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.