हिंगण्यात मासेमारीदरम्यान विजेचा धक्का; व्यक्तीचा मृत्यू

    02-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : हिंगणा तालुक्यातील किन्ही (नेरी) गावात मासेमारी करताना विजेचा धक्का लागून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सदाशिव नामदेव मडावी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी सदाशिव मडावी हे नांदिरा तलावाच्या नाल्याजवळ मासेमारीसाठी गेले होते. मासे पकडण्यासाठी त्यांनी पाण्यात विजेचा प्रवाह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच दरम्यान त्यांनाच जोरदार विजेचा धक्का बसला आणि ते घटनास्थळीच कोसळले.

नाल्याजवळील व्यसनमुक्ती केंद्रातील काही नागरिकांनी त्यांना बेशुद्ध अवस्थेत पाहिले आणि तातडीने कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर त्यांना व्याहाड पेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात रेफर केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेप्रकरणी हिंगणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.
पाण्यात विजेची तार सोडणे जीवावर बेतले; हिंगण्यात धक्कादायक प्रकार