
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : आम आदमी पक्ष (आप) सोडून नुकतेच भारतीय जनता पक्षात (भाजप) दाखल झालेले राज्यसभेचे खासदार संदीप पाठक यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या विरोधात पंजाब पोलिसांनी दोन एफआयआर दाखल केल्याने अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाठक यांच्यावर अजामीनपात्र कलमांखाली गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर पंजाब पोलीस त्यांच्या अटकेसाठी दिल्लीतील सरकारी निवासस्थानी पोहोचले होते. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच संदीप पाठक यांनी मागच्या दरवाजातून पलायन केल्याची माहिती समोर आली आहे. ते पांढऱ्या रंगाच्या कारमधून तातडीने निघून गेल्याचेही सांगितले जात आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान मोठा हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला.
विशेष म्हणजे, संदीप पाठक यांनी अवघ्या आठ दिवसांपूर्वीच आपला राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. आपचे ‘चाणक्य’ म्हणून ओळख असलेल्या पाठक यांनी पक्ष संघटनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या रणनीतीमुळेच २०२२ मध्ये पंजाबमध्ये आपला सत्तेपर्यंतचा प्रवास यशस्वी ठरला होता.
दरम्यान, आपमधील फुटीनंतर राज्यसभेतील १० पैकी तब्बल ७ खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
याबाबत प्रतिक्रिया देताना संदीप पाठक म्हणाले की, “माझ्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरबाबत मला कोणतीही माहिती नाही. पोलिसांनी माझ्याशी संपर्क साधलेला नाही. मी आयुष्यभर प्रामाणिकपणे देशसेवा केली आहे. देश कोणत्याही पक्षापेक्षा मोठा आहे. माझ्यावर कारवाई होत असेल, तर काही जण घाबरलेले आहेत, एवढंच मी म्हणू शकतो.”
या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.