
Image Source:(Internet)
मुंबई : जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर देशासमोर निर्माण होणाऱ्या आर्थिक आणि इंधन संकटाची शक्यता लक्षात घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला संयम आणि बचतीचा संदेश दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडीओद्वारे नागरिकांना राष्ट्रहितासाठी काही सवयी बदलण्याचे आवाहन केले.
पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक, मेट्रो आणि ई-बसेसचा जास्तीत जास्त वापर करावा, असे त्यांनी सांगितले. तसेच कारपूलिंगला प्राधान्य देण्यासोबतच नवीन वाहन घेताना इलेक्ट्रिक वाहनांचा विचार करण्याचा सल्लाही त्यांनी दिला.
ऊर्जाबचतीवर भर देताना AC चे तापमान 24 डिग्रीखाली ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले. कोविड काळात जसा ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय वापरण्यात आला, तशी कार्यपद्धती पुन्हा अवलंबण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
अनावश्यक खर्च आणि परदेश दौरे टाळून देशांतर्गत पर्यटनाला चालना द्यावी, असे सांगत त्यांनी स्वदेशी अर्थव्यवस्थेला हातभार लावण्याचे आवाहन केले. “लहान बदलांमधूनही देशासाठी मोठे योगदान देता येते,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
सरकारनेही काटकसरीची सुरुवात केल्याचे सांगताना त्यांनी स्वतःचा ताफा कमी केल्याची तसेच मंत्री आणि अधिकाऱ्यांचे परदेश दौरे रद्द केल्याची माहिती दिली. “राष्ट्र प्रथम हीच आपली भूमिका असली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.