विद्यार्थ्याच्या एका चुकीने बिंग फुटलं!

Image Source:(Internet)
नागपूर : देशभरात चर्चेत आलेल्या ‘NEET-UG 2026’ पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासातून मोठी माहिती समोर आली आहे. या संपूर्ण रॅकेटमागे कोणतेही आंतरराज्यीय टोळके नसून, एक नामांकित केमिस्ट्री शिक्षकच मुख्य सूत्रधार असल्याचे उघड झाले आहे. पी. व्ही. कुलकर्णी या शिक्षकाने स्वतःच्या कोचिंग क्लासला प्रसिद्धी मिळवून देण्यासाठी हा कट रचल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
लातूरचा रहिवासी असलेला कुलकर्णी पुण्यात स्थायिक झाला होता. त्याने सहकारी मनीषा वाघमारे हिच्यासोबत मिळून स्वतःच्या घरातून निवडक विद्यार्थ्यांसाठी गुप्त बॅच सुरू केली होती. या बॅचमधील विद्यार्थ्यांना थेट मूळ प्रश्नपत्रिकेतील प्रश्न, पर्याय आणि उत्तरे पुरवली जात होती. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची रक्कम घेतल्याचा संशय आहे.
मात्र, कुलकर्णीचा संपूर्ण डाव त्याच्याच एका विद्यार्थ्यामुळे उघडकीस आला. संबंधित विद्यार्थ्याने मिळालेली प्रश्नपत्रिका मित्रांसह काही कोचिंग क्लास चालकांना सोशल मीडियावर पाठवली. काही वेळातच प्रश्नपत्रिका व्हॉट्सॲपसह विविध माध्यमांवर व्हायरल झाली. सुरुवातीला याकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. पण परीक्षा झाल्यानंतर व्हायरल झालेल्या प्रश्नांचा आणि मूळ प्रश्नपत्रिकेचा ताळमेळ जुळल्याने पेपरफुटीचा संशय बळावला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण मंत्रालयाने १२ मे रोजी सीबीआयकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर सीबीआयने जयपूर, गुरुग्राम, नाशिक आणि अहमदाबादसह विविध शहरांत छापेमारी करत मोठी कारवाई केली. आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी काही जणांची चौकशी सुरू आहे.
तपासादरम्यान आरोपींकडून मोबाईल, लॅपटॉप, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. हे साहित्य फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आले असून, विद्यार्थ्यांकडून कोट्यवधी रुपये उकळल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. त्यामुळे सीबीआयने आता आर्थिक व्यवहारांचाही सखोल तपास सुरू केला आहे.