
Image Source:(Internet)
मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पुन्हा तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ३० मेपासून अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करण्याची घोषणा करत राज्य सरकारविरोधात जोरदार भूमिका घेतली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट आरोप केले. मराठा-कुणबी प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत सरकारकडून जाणूनबुजून विलंब केला जात असल्याचा दावा त्यांनी केला. “समाज गेली अनेक वर्षे शांततेत लढा देत आहे, पण अजूनही मराठा समाजाच्या हाती काहीच लागले नाही,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
जून महिन्यात शैक्षणिक प्रवेशप्रक्रिया सुरू होणार असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचेही त्यांनी सांगितले. “लाखो कुणबी नोंदी सापडल्यानंतरही प्रमाणपत्रे दिली जात नाहीत. मराठा समाजाला मागे ठेवण्याचे षडयंत्र सुरू आहे,” असा आरोप जरांगे यांनी केला.
अंतरवाली सराटीत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी आंदोलन अधिक व्यापक करण्याचा इशारा दिला. “या वेळी संपूर्ण राज्यातील मराठा समाज एकवटणार असून सरकारला समाजाची ताकद दाखवून दिली जाईल,” असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी, “सर्व निर्णय मुख्यमंत्री स्तरावरून होत असतील, तर मराठा समाजाच्या प्रमाणपत्रांचा प्रश्न अद्याप प्रलंबित का आहे?” असा सवाल उपस्थित केला. अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रे दिली जात नसल्याबद्दलही त्यांनी सरकारलाच जबाबदार धरले.
३० मेपासून सुरू होणाऱ्या या उपोषणामुळे राज्यातील मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण तापवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.