लाडक्या बहिणीनं दिलासा;दोन दिवसांत खात्यात 3000 रुपये जमा !

    16-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत लाभार्थी महिलांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. मागील काही महिन्यांपासून थकीत असलेले हप्ते आता टप्प्याटप्प्याने महिलांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थींना अखेर आर्थिक दिलासा मिळाला आहे.

गुरुवारी मार्च महिन्याचा हप्ता खात्यात जमा झाल्यानंतर, शुक्रवारी पुन्हा एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला. त्यामुळे अनेक महिलांच्या खात्यात अवघ्या दोन दिवसांत एकूण 3000 रुपये जमा झाले आहेत.

फेब्रुवारीपासून हप्त्याची वाट पाहणाऱ्या लाभार्थी महिलांना यामुळे मोठा आधार मिळाला आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यांचे एकत्रित पैसे मिळाल्याने आर्थिक ताण काही प्रमाणात कमी झाला आहे.

राज्य सरकारकडून 14 आणि 15 मे रोजी अनुक्रमे मार्च आणि एप्रिल महिन्यांच्या हप्त्यांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. याआधी 24 मार्च रोजी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता जमा करण्यात आला होता.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारने लोकसभा निवडणुकीनंतर सुरू केलेली महत्त्वाकांक्षी योजना आहे. जुलै 2024 पासून या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दरमहा थेट आर्थिक मदत जमा केली जाते.

योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे ही प्रमुख अट निश्चित करण्यात आली आहे.

ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान काही लाभार्थ्यांमध्ये त्रुटी आढळल्याने काही नावांची पडताळणी करण्यात आली आहे.

दरम्यान, दोन महिन्यांचे हप्ते एकत्र जमा झाल्याने राज्यभरातील लाडक्या बहिणींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.