
Image Source:(Internet)
नागपूर : विदर्भातील उष्णतेने आता विक्राळ स्वरूप धारण केले असून नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. भारतीय हवामान विभागाने नागपूरसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडल्याचे चित्र आहे. कडक उन्हामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार २० मेपर्यंत विदर्भात उष्णतेची तीव्रता कायम राहणार आहे.
अकोला, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, वाशीम, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये ‘हीट वेव्ह’चा प्रभाव राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. अकोला आणि चंद्रपूरमध्ये तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, गुरुवारी नोंदवलेल्या तापमानात अकोला जिल्हा ४५.९ अंश सेल्सियससह सर्वाधिक उष्ण ठरला. वर्धा येथे ४५.५ अंश, अमरावतीत ४५.२ अंश तर नागपूरमध्ये ४४ अंश तापमानाची नोंद झाली. सलग काही दिवसांपासून विदर्भातील तापमान ४२ अंशांच्या पुढे कायम आहे.
जिल्हानिहाय तापमान
अकोला – 45.9°C
वर्धा – 45.5°C
अमरावती – 45.2°C
नागपूर – 44.0°C
यवतमाळ – 43.6°C
वाशीम – 43.4°C
चंद्रपूर – 42.8°C
गडचिरोली – 42.0°C
बुलढाणा – 41.5°C
गोंदिया – 41.2°C
हवामान तज्ज्ञांच्या मते, उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या वाऱ्यांमुळे तापमानात मोठी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका वाढला असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.