
Image Source:(Internet)
मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील नव्याने सुरू झालेल्या मिसिंग लिंक परिसरात शुक्रवारी भीषण अपघातांची मालिका पाहायला मिळाली. अवघ्या काही तासांच्या अंतरात झालेल्या दोन मोठ्या अपघातांमध्ये ३ जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनांमुळे संपूर्ण महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
घाटातील उतारावर ट्रकचे ब्रेक निकामी
पहिली दुर्घटना खंडाळा घाटातील ढेकू गावाजवळ मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. तीव्र उतारावरून येणाऱ्या एका ट्रकचे अचानक ब्रेक फेल झाले. नियंत्रण सुटलेल्या ट्रकने समोरील दोन ट्रकना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
या अपघातात संजीव डांगे (५२) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. ट्रकमधील रंग आणि पुट्टीचे साहित्य रस्त्यावर सांडल्याने दोन्ही मार्गिकांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली.
काही तासांत दुसरी दुर्घटना; बसने तीन कारना उडवले
पहिल्या अपघातानंतर काही वेळातच मिसिंग लिंकच्या बोगद्याजवळ दुसरा मोठा अपघात झाला. भरधाव वेगातील एका बसने पुढे जाणाऱ्या तीन कारना मागून जोरदार धडक दिली. या धडकेत कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातानंतर काही प्रवासी वाहनांमध्ये अडकून पडले होते. महामार्ग पोलीस, आयआरबी आणि हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत गॅस कटरच्या सहाय्याने वाहनांचे दरवाजे कापून जखमींना बाहेर काढले. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोन तास महामार्ग ठप्प, वाहनांच्या रांगा
सलग दोन अपघातांमुळे वीकेंडला मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठी कोंडी झाली. अनेक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. रस्त्यावर सांडलेले साहित्य साफ केल्यानंतर एक मार्ग सुरू करण्यात आला आणि नंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली.
मिसिंग लिंकवर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
प्रवासाचा वेळ कमी करणारा मिसिंग लिंक प्रकल्प आता सुरक्षेच्या कारणामुळे चर्चेत आला आहे. घाटातील तीव्र उतार, अतिवेग आणि वाहनांची तांत्रिक बिघाड यामुळे भविष्यात अशा दुर्घटना वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. पोलिसांनी चालकांना घाटमार्गात वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आणि वाहनांची तपासणी करूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.