अकरावी ऑनलाइन प्रवेशात तांत्रिक अडथळे; विद्यार्थी-पालक त्रस्त

    14-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : दहावीच्या निकालानंतर सुरू झालेल्या अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. संकेतस्थळ वारंवार बंद पडणे, लॉगिन न होणे आणि हेल्पलाइनवर संपर्क न होणे यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे.

राज्यभरातील हजारो विद्यार्थी प्रवेश अर्ज भरत असल्याने प्रणालीवर ताण येत असून, दिलेला एकमेव हेल्पलाइन क्रमांक सतत व्यस्त लागत असल्याची तक्रार पालकांकडून करण्यात येत आहे. नेरूळमधील एका विद्यार्थ्याला लॉगिनसाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागल्याचे समोर आले.

ठाणे, पालघर, अंधेरी, बोरिवली, मुलुंड, भांडुप आणि भायखळा परिसरातील विद्यार्थ्यांनाही दिवसभर विविध तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ अधिक वाढल्याचे दिसून आले.

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिक हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करून द्यावेत, तसेच विभागनिहाय तक्रार निवारण केंद्रांची माहिती जाहीर करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. मुंबईसह इतर मोठ्या शहरांत अतिरिक्त मदत केंद्र सुरू करण्याची मागणीही पुढे येत आहे.

दरम्यान, दुपारनंतर काही प्रमाणात संकेतस्थळ सुरळीत झाल्याचे काही पालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विविध ठिकाणी तक्रार निवारण केंद्र सुरू करण्यात आली असून, तेथे अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.