‘बुलेट’वर स्वार होत मुख्यमंत्री विधानभवनात; फडणवीसांचा साधेपणातून इंधन बचतीचा दमदार संदेश

    14-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : लाल दिव्यांच्या ताफ्याऐवजी आज विधानभवनाच्या दिशेने धावणारी एक ‘बुलेट’ सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरली. कारण त्या बुलेटवर स्वार होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मुख्यमंत्र्यांनी आज थेट बुलेट चालवत विधानभवन गाठले आणि आपल्या कृतीतून वेगळाच आदर्श घालून दिला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बुलेट चालवत होते, तर मागील सीटवर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार बसले होते. विधानपरिषदेतील नवनिर्वाचित सदस्यांच्या शपथविधी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री शासकीय निवासस्थानावरून निघाले आणि नेहमीचा भला मोठा ताफा बाजूला ठेवत साधेपणाची नवी झलक दाखवली.

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री बुलेटवरून उतरल्याक्षणी उपस्थित आमदार, अधिकारी आणि पत्रकारांची एकच गर्दी झाली. मुख्यमंत्र्यांचा हा हटके अंदाज पाहून अनेकांनी मोबाईलमध्ये तो क्षण कैद केला.

पंतप्रधान Narendra Modi यांनी अलीकडेच इंधन बचत आणि पर्यावरण रक्षणासाठी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

दरम्यान, जागतिक ऊर्जा संकट आणि वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी प्रशासनालाही काटकसरीचे निर्देश दिले आहेत. मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ताफ्यातील वाहनांची संख्या निम्म्यावर आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून, परदेश दौऱ्यांवरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

याशिवाय मंत्रालयातील बैठका आता मोठ्या प्रमाणात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यांमधून मुंबईकडे होणारा अनावश्यक प्रवास टाळून इंधन आणि वेळ दोन्हीची बचत होणार आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या ‘बुलेट एन्ट्री’ने केवळ राजकीय चर्चांनाच उधाण आले नाही, तर साधेपणा आणि जबाबदारीचा संदेशही राज्यभर पोहोचला आहे.