
Image Source:(Internet)
नवी दिल्ली : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मतदार याद्या अधिक अचूक आणि पारदर्शक करण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली आहे. आयोगाने गुरुवारी देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. या मोहिमेद्वारे मतदार यादीतील बोगस, डुप्लिकेट आणि अपात्र नावे शोधून काढण्यावर भर दिला जाणार आहे.
घराघरांत पोहोचणार BLO अधिकारी
या विशेष मोहिमेसाठी तब्बल ३.९४ लाख बूथ लेव्हल अधिकारी (BLO) नागरिकांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. देशभरातील सुमारे ३६.७३ कोटी मतदारांची माहिती तपासली जाणार असून, या प्रक्रियेत विविध राजकीय पक्षांचे ३.४२ लाख बूथ लेव्हल एजंट्स (BLA) देखील सहभागी होणार आहेत.
निवडणूक आयोगाने ही मोहीम राष्ट्रीय जनगणनेच्या ‘हाऊस-लिस्टिंग’ प्रक्रियेशी जोडली आहे. त्यामुळे सरकारी यंत्रणेचा वेळ वाचण्यासोबतच मतदारांची माहिती अधिक अचूकपणे संकलित होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.
तीन राज्यांना तात्पुरता दिलासा
हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागांना सध्या या मोहिमेतून वगळण्यात आले आहे. बर्फवृष्टी, कडाक्याची थंडी आणि दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे या भागात प्रत्यक्ष पडताळणी करणे कठीण असल्याने आयोगाने या राज्यांसाठी स्वतंत्र कार्यक्रम नंतर जाहीर करण्याचे संकेत दिले आहेत.
“प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत असावे”
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नागरिकांना या मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे. “प्रत्येक पात्र मतदाराचे नाव यादीत असणे आणि अपात्र नावे वगळली जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नागरिकांनी निवडणूक अधिकाऱ्यांना योग्य माहिती देऊन सहकार्य करावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांनी काय करावे?
निवडणूक कर्मचारी घरी आल्यानंतर ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती योग्यरीत्या द्यावी. तसेच आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे वेळोवेळी तपासून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.