मोदींच्या आवाहनानंतर गडकरींची साथ; ‘व्हीआयपी ताफा’ अर्ध्यावर, अधिकारी- पत्रकारांसह बसने करणार दौरा!

    13-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : देशात इंधन बचतीचा मुद्दा गंभीर बनत असताना केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः उदाहरण घालून देणारा निर्णय घेतला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग प्रकल्पांच्या पाहणीसाठी होणाऱ्या दोन दिवसीय दौऱ्यात गडकरी मोठ्या व्हीआयपी ताफ्याऐवजी बसने प्रवास करणार आहेत. विशेष म्हणजे या प्रवासात अधिकारी, पत्रकार आणि सुरक्षा कर्मचारीही त्यांच्यासोबत असणार आहेत.

१४ आणि १५ मे २०२६ रोजी होणाऱ्या या दौऱ्यासंदर्भात गडकरी यांनी पुणे शहर पोलिस आयुक्त, पुणे-सातारा-सोलापूर जिल्हाधिकारी आणि संबंधित पोलिस अधीक्षकांना अधिकृत पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी इंधन बचतीचे केलेले आवाहन लक्षात घेता वाहतुकीसाठी होणारा इंधन वापर कमी करणे ही काळाची गरज आहे.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या नेहमीपेक्षा ५० टक्क्यांनी कमी ठेवण्याचे निर्देश देण्याची विनंती प्रशासनाला केली आहे. “राष्ट्रीय ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने इंधन बचत महत्त्वाची असून, सामूहिक प्रवासामुळे वाहतूक व्यवस्थापनही अधिक सुलभ होईल आणि नागरिकांची गैरसोय टळेल,” असे गडकरी यांनी पत्रात म्हटले आहे.

सामान्यतः व्हीआयपी दौऱ्यांवेळी मोठ्या प्रमाणात वाहनांचा ताफा रस्त्यावर उतरतो. त्यामुळे वाहतूक कोंडी, इंधनाचा वाढता वापर आणि नागरिकांना होणारा त्रास हे प्रश्न कायम चर्चेत असतात. मात्र गडकरी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ‘संदेश देण्यापेक्षा कृतीतून दाखवण्याला’ प्राधान्य दिल्याची चर्चा सुरू झाली आहे.

राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातही या निर्णयाचे स्वागत होत असून, इंधन बचतीच्या मोहिमेला गती देण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी स्वतः पुढाकार घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.