मोदींच्या आवाहनानंतर शिवसेनेचा मोठा निर्णय; परदेश दौरे रद्द, मंत्र्यांचा ताफाही झाला मर्यादित

    13-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात इंधन बचतीचा मुद्दा गंभीर बनला आहे. अमेरिका-इराण संघर्षामुळे स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्याने जागतिक ऊर्जा संकटाची चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना आणि प्रशासनाला इंधन बचतीचे आवाहन केले होते.

या आवाहनानंतर आता शिवसेना नेते आणि मंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, शिवसेनेच्या मंत्र्यांचे सर्व परदेश दौरे तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्र्यांच्या वाहन ताफ्यातही मोठी कपात करण्यात आली असून आवश्यक तेवढ्याच वाहनांचा वापर केला जाणार आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः इलेक्ट्रिक वाहनाचा वापर सुरू करून या निर्णयाची सुरुवात केली असल्याचे सामंत यांनी सांगितले. अनेक मंत्र्यांनीही आता इंधन बचतीसाठी ईव्ही गाड्यांचा वापर सुरू केला आहे.

पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या आवाहनाची अंमलबजावणी प्रत्यक्ष कृतीतून दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक तितकाच ताफा ठेवण्यात येणार असून अनावश्यक खर्च आणि इंधन वापर टाळण्यावर भर दिला जाणार आहे.

याशिवाय मंत्री शंभूराज देसाई आणि आशिष शेलार यांच्यासह अनेक मंत्र्यांनी आपले नियोजित परदेश दौरे रद्द केल्याची माहितीही उदय सामंत यांनी दिली. सरकार म्हणून जबाबदारी पार पाडताना पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत असल्याचे त्यांनी नमूद केले.