
Image Source:(Internet)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत घडामोडींना वेग आला असतानाच पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे सुमारे २२ आमदारांसह भविष्यात भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवू शकतात, असा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला.
रोहित पवार म्हणाले की, या संदर्भातील राजकीय हालचाली आधीपासूनच सुरू आहेत आणि अनेक गोष्टींवर चर्चा पूर्ण झाली आहे. फक्त योग्य वेळेची प्रतीक्षा सुरू असून अपेक्षेपेक्षा प्रक्रिया अधिक वेगाने घडत असल्याचे त्यांनी सांगितले. काही आमदारांनी आपली भूमिका निश्चित केल्याचेही त्यांनी सूचित केले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील काही आमदारांचाही उल्लेख करत आगामी काळात मोठे राजकीय फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली. भाजपसोबत सध्या असलेल्या गटांबरोबर जाणार नसल्याचे सांगतानाच, भाजपपासून दूर होऊन कोणी आमच्याकडे आले तर त्यांचे स्वागत केले जाईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघटनात्मक वादामुळे पक्षात अस्वस्थता वाढली आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याचे समोर आल्यानंतर पक्षात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर ही प्रशासकीय पातळीवरील चूक असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.
मात्र, नव्या पत्रव्यवहारातही दोन्ही नेत्यांच्या जबाबदाऱ्यांचा स्पष्ट उल्लेख नसल्याने संभ्रम कायम आहे. प्रफुल्ल पटेल यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश ठेवण्यात आला असला, तरी त्यांना नेमके कोणते पद देण्यात आले आहे, याबाबत स्पष्टता नाही. सुनील तटकरे यांच्या नावासमोरही अधिकृत पद नमूद नसल्यामुळे पक्षात विविध चर्चांना उधाण आले आहे.
या सर्व घडामोडींमुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी वाढत असल्याची चर्चा आहे. पक्षात काही गटांमध्ये संघर्ष तीव्र होत असल्याचे बोलले जात असून नेतृत्वाच्या निर्णयांवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.