नागपुरात ड्रग्सच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांचा मोठा प्रहार; ‘ऑपरेशन यू-टर्न’ अंतर्गत तिघांवर गुन्हे

    13-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी ड्रग्सच्या प्रभावाखाली वाहन चालवणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. सिताबर्डी ट्रॅफिक झोनतर्फे राबविण्यात आलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’ दरम्यान गांजाचे सेवन करून वाहन चालवणाऱ्या तीन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

१२ मे रोजी सायंकाळी शहरातील विविध भागांत नाकाबंदी आणि तपासणी मोहीम राबवण्यात आली. यावेळी पोलिसांनी अत्याधुनिक ड्रग डिटेक्शन मशीनच्या मदतीने वाहनचालकांची तपासणी केली. तपासणीत तिघे जण THC अर्थात गांजाच्या प्रभावाखाली वाहन चालवत असल्याचे स्पष्ट झाले.

तीन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई-

-कन्नमवार चौक परिसरात एका ४२ वर्षीय व्यक्तीला अल्फा वाहन बेदरकारपणे चालवताना पकडण्यात आले.
-सिव्हिल लाईन्समधील हिरामल डायनिंग हॉलजवळ २३ वर्षीय युवक दुचाकी चालवत असताना संशयित अवस्थेत आढळला.
-ट्रॅफिक कार्यालयासमोर ५७ वर्षीय ऑटोचालकावरही कारवाई करण्यात आली.
-तिन्ही आरोपींविरोधात NDPS कायदा, मोटार वाहन कायदा कलम १८५ तसेच BNSS कलम १७३ अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

दरम्यान कारवाई PI अरविंद पुरी आणि API विक्रम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठलसिंग राजपूत पुढील तपास करत आहेत.

नागपूर पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, अमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांविरोधात अशाच धडक मोहिमा पुढेही सुरू राहणार आहेत.