
Image Source:(Internet)
मुंबई : २००८ मधील रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे हे आज ठाणे न्यायालयात हजर झाले होते. कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरती परीक्षेदरम्यान झालेल्या आंदोलन आणि मारहाणीप्रकरणी त्यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आज न्यायालयात महत्त्वाची सुनावणी पार पडली.
सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी राज ठाकरे यांना थेट काही प्रश्न विचारले. “रेल्वे भरती परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली, हे खरं आहे का?” असा प्रश्न न्यायालयाने विचारला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे यांनी हा आरोप पूर्णपणे खोटा असल्याचं सांगितलं.
त्यानंतर “तुमच्याविरोधात खोटी केस दाखल करण्यात आली असं तुम्हाला वाटतं का?” असा सवालही न्यायालयाने केला. यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी, “त्या वेळी मी घटनास्थळी नव्हतो. काही कामानिमित्त नाशिकला गेलो होतो,” असं स्पष्ट केलं.
साक्षीदारांच्या जबाबांमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी लाठी-काठ्यांसह परीक्षार्थ्यांवर हल्ला केल्याचा उल्लेख असल्याबाबतही न्यायालयाने विचारणा केली. मात्र हे सर्व आरोप खोटे असल्याचं राज ठाकरे यांनी पुन्हा नमूद केलं.
दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १८ मे रोजी होणार आहे.
नेमकं प्रकरण काय?
२००८ साली रेल्वे भरती परीक्षेसाठी कल्याण येथे आलेल्या उत्तर भारतीय उमेदवारांवर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आंदोलनादरम्यान रेल्वे मालमत्तेचंही नुकसान झाल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणात राज ठाकरे आणि अन्य सात जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याआधी ११ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या सुनावणीतही राज ठाकरे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले होते. तसेच न्यायालयीन प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करू, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.