मुख्यमंत्री होताच विजयांचा मोठा निर्णय; त्रिशाच्या ‘करुप्पू’साठी तमिळनाडूत बदलला सकाळच्या शोचा नियम!
13-May-2026
Total Views |

Image Source:(Internet)
चेन्नई :तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच धडाकेबाज निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. बुधवारी विधानसभेत १४४ आमदारांच्या पाठिंब्याने बहुमत सिद्ध केल्यानंतर विजय यांनी प्रशासनिक कामांमध्ये वेग आणला. राज्यातील ७१७ मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता त्यांनी तमिळ चित्रपटसृष्टीसाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
अभिनेत्री त्रिशा कृष्णन आणि अभिनेता सूर्या यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘करुप्पू’ चित्रपटाला सकाळी ९ वाजताचा विशेष शो दाखवण्याची परवानगी विजय सरकारने दिली आहे. दिग्दर्शक आर. जे. बालाजी यांच्या या चित्रपटाचा पहिला शो १४ मेपासून सकाळी ९ वाजता प्रदर्शित होणार आहे. तमिळनाडूमध्ये यापूर्वी सकाळच्या विशेष शोजना मर्यादा होत्या. त्यामुळे हा निर्णय चर्चेचा विषय ठरला आहे.
‘ड्रीम वॉरियर पिक्चर्स’ या निर्मिती संस्थेने मुख्यमंत्री कार्यालयातील विजय यांचा फोटो शेअर करत त्यांचे आभार मानले. निर्माते एस. आर. प्रभू आणि एस. आर. प्रकाशबाबू यांनी ‘करुप्पू’च्या विशेष शोसाठी मिळालेल्या परवानगीबद्दल सरकारचे कौतुक केले.
तमिळनाडूमध्ये सुपरस्टार कलाकारांच्या चित्रपटांवेळी चाहत्यांची मोठी गर्दी होत असल्याने प्रशासनाने काही वर्षांपूर्वी सकाळच्या आणि पहाटेच्या शोवर निर्बंध आणले होते. २०२३ मध्ये थुनाइवू आणि वारिसू या चित्रपटांच्या प्रदर्शनावेळी झालेल्या गोंधळात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने कठोर भूमिका घेतली होती. त्यानंतर फक्त सकाळी ९ नंतरचेच शो मंजूर करण्यात येत होते.
दरम्यान, विजय आणि त्रिशा यांच्या नात्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून विविध चर्चांना उधाण आले आहे. विजय यांच्या राजकीय प्रवासात त्रिशाने उघडपणे पाठिंबा दिल्याने या चर्चांना आणखी हवा मिळाली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतरही त्रिशाची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.