
Image Source:(Internet)
नागपूर : राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच शरद पवार आणि तटकरे कुटुंबीयांच्या भेटीवरून सुरू झालेल्या चर्चांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “प्रत्येक भेटीत राजकारण शोधणे चुकीचे आहे. तटकरे कुटुंबीयांचे शरद पवार यांच्याशी अनेक वर्षांचे कौटुंबिक आणि सामाजिक संबंध आहेत,” असे सांगत त्यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
“मी स्वतःही राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे अशा भेटींना राजकीय रंग देणे योग्य नाही,” असेही बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, मतीन घरपाडकाम प्रकरणावर त्यांनी कठोर भूमिका घेतली. गंभीर आरोप असलेल्या आरोपींना मदत करणे चुकीचे असल्याचे सांगत, “समाज हादरवणाऱ्या प्रकरणांतील आरोपींना आश्रय देणाऱ्यांविरोधातही योग्य ती कारवाई झाली पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
परभणीतील वाळू माफिया प्रकरणावर बोलताना बावनकुळे आक्रमक झाले. “अशा आरोपींना अजिबात सोडणार नाही. बुलढाण्यात तहसीलदारांवर हल्ला झाल्यानंतर आम्ही तातडीने कारवाई केली होती. परभणी प्रकरणातही आरोपींचा गुन्हेगारी इतिहास तपासून कठोर कारवाई करण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
इतर मागासवर्गीय आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीर असल्याचे सांगत बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पुढील पंधरा दिवसांत केंद्र सरकारकडे पुन्हा पाठपुरावा केला जाणार आहे.
काटकसरीच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी प्रशासनातील खर्च कमी करण्यासाठी दूरदृश्य माध्यमातून बैठका घेणे आणि अनावश्यक दौरे टाळण्यावर भर दिला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या सूचनांचे पालन प्रत्येकाने करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
देशहितासाठी काही काळ काटकसर आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी इंदिरा गांधी , पी चिदंबरम आणि महात्मा गांधी यांच्या स्वदेशी आणि बचतीच्या आवाहनांचा दाखला दिला. “देश मजबूत करण्यासाठी काही गोष्टींमध्ये संयम ठेवावा लागतो,” असेही बावनकुळे म्हणाले.