घराबाहेर पडताना सावधान! महाराष्ट्रात उष्णतेचा कहर वाढला; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट

    12-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. विशेषतः विदर्भासह उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान झपाट्याने वाढत असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, विदर्भात पुढील काही दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अकोल्यात सोमवारी तब्बल ४५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

राजस्थान आणि गुजरात परिसरातील चक्रावाती स्थितीमुळे विदर्भात कोरडी व उष्ण हवा वाहत असून त्यामुळे तापमानात वाढ होत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. मे महिन्यात विदर्भात ४४ ते ४६ अंश तापमान सामान्य मानले जात असले तरी यंदाची उष्णता अधिक तीव्र जाणवत आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातही उष्णतेचा प्रचंड तडाखा बसत आहे. पाचोरा, भडगाव आणि चाळीसगाव येथे तापमान ४४ अंशांवर पोहोचले असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा ४४ अंशांच्या पुढे गेला असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत तब्बल चार अंशांनी वाढ झाली आहे. वाढत्या उष्णतेमुळे बाजारपेठांवर परिणाम झाला असून कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांची वर्दळ कमी झाली आहे.

नाशिकमध्येही दोन वर्षांनंतर प्रथमच तापमानाने ४२ अंशांचा टप्पा गाठला आहे. शहरात उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला असून तीव्र उन्हामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

नंदुरबार जिल्ह्यातही तापमान ४५ अंशांच्या आसपास पोहोचले आहे. प्रशासनाने नागरिकांना दुपारी ११ ते ३ या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. उष्माघात टाळण्यासाठी भरपूर पाणी, ओआरएस आणि लिंबूपाण्याचे सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात उष्माघात कक्ष उभारण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.