नीट 2026 वर मोठा निर्णय; पेपरफुटी प्रकरणानंतर परीक्षा रद्द, सीबीआयकडे तपास

    12-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर: वैद्यकीय शिक्षणासाठी होणाऱ्या NEET 2026 परीक्षेबाबत मोठी घडामोड समोर आली आहे. पेपरफुटीच्या गंभीर आरोपांनंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) ने ३ मे रोजी घेतलेली NEET परीक्षा रद्द करण्याची घोषणा केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला आहे.

परीक्षा झाल्यानंतर विविध राज्यांतून प्रश्नपत्रिका फुटल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. सोशल मीडियावरही कथित प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. यानंतर केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार NTA ने अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

NTA च्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसणार आहे. पुनर्परीक्षेच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार असून विद्यार्थ्यांना पूर्वीच्या परीक्षा केंद्रावरच परीक्षा देता येणार आहे.

या निर्णयामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा तयारी करावी लागणार असून अनेक पालकांनीही शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. NEET ही देशातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सर्वात महत्त्वाची परीक्षा मानली जाते. त्यामुळे पेपरफुटीच्या या प्रकरणाने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

आता सीबीआय तपासातून पेपरफुटीमागील संपूर्ण रॅकेट आणि जबाबदार व्यक्तींचा शोध घेतला जाणार असल्याने या प्रकरणाकडे देशाचे लक्ष लागले आहे.