
Image Source:(Internet)
नागपूर : शहरात एका किरकोळ विनोदातून थेट रक्तरंजित हल्ल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. “गुलाबजाम असतील तर आम्हालाही द्या,” असे मजेत बोलणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला.
पोलिसांच्या माहितीनुसार, आयुष मेश्राम, बादल शेंडे आणि अक्षय नागपुरे हे तिघे केटरिंगचे काम करतात. ९ मे रोजी रात्री काम आटोपून ते परतत असताना त्यांची ओळखीचा मो. अख्तर रजा याच्याशी भेट झाली. यावेळी वातावरण हलकं करण्यासाठी अख्तरने “गुलाबजाम आणले असतील तर आम्हालाही खायला द्या,” अशी मिश्कील टिप्पणी केली.
मात्र, या बोलण्याचा आरोपींना राग आला. सुरुवातीला त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर तिघेही तेथून निघून गेले. काही वेळाने ते पुन्हा परत आले आणि अख्तरसोबत पुन्हा वाद घालू लागले.
वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी चाकू काढत अख्तरवर हल्ला केला. या हल्ल्यात त्याच्या मांडीला गंभीर दुखापत झाली. अचानक झालेल्या प्रकारामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ जखमी अख्तरला रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच शांतिनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. किरकोळ कारणांवरून वाढणाऱ्या हिंसक घटनांमुळे शहरात चिंता व्यक्त केली जात आहे.