पोलिसांना फडणवीस सरकारचा मोठा दिलासा; घरकुलांसाठी १,७६८ कोटींचा निधी

    12-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी Devendra Fadnavis सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पोलिसांच्या प्रलंबित घरकुल प्रस्तावांना मंजुरी देत तब्बल १,७६८.०८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील ५,४५९ पोलीस कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाकडे अनेक दिवसांपासून घरबांधणीसंबंधी प्रस्ताव प्रलंबित होते. अखेर सरकारने त्याला हिरवा कंदील दाखवत निधी मंजूर केला. त्यामुळे आता हजारो पोलिसांच्या हक्काच्या घराचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडियावरून या निर्णयाची माहिती देताना, पोलीस दलाच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे सांगितले. तसेच २०१४ ते २०१९ दरम्यान सुरू असलेली व्याजसवलत अनुदान योजना मागील सरकारच्या काळात बंद करण्यात आली होती. मात्र, विद्यमान सरकारने ती पुन्हा सुरू करत पोलिसांच्या घरांच्या प्रश्नाला प्राधान्य दिल्याचे त्यांनी नमूद केले.

‘घरबांधणी अग्रीम’ (HBA) योजनेअंतर्गत अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी घर खरेदी किंवा स्वतःच्या जागेवर बांधकामासाठी अर्ज केले होते. सर्व अर्जांची तांत्रिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आता निधी वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निर्णयामुळे पोलिसांना आर्थिक आधार मिळणार असून, वाढत्या घरांच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर हजारो कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यास मदत होणार आहे. तसेच अनेक वर्षांपासून रखडलेले प्रस्ताव मार्गी लागल्याने पोलीस दलातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.