दिल्लीचा विजय, पण अक्षर पटेलला मोठा फटका; लाखोंचा दंड ठोठावला
12-May-2026
Total Views |

Image Source:(Internet)
पंजाबविरुद्धच्या थरारक सामन्यात दिल्ली संघाने शानदार विजय मिळवला असला, तरी संघाचा कर्णधार अक्षर पटेल याला मोठा फटका बसला आहे. संथ षटकगतीमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याच्यावर १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.
धरमशाला येथे झालेल्या या सामन्यात दिल्ली संघाला ठरलेल्या वेळेत २० षटके पूर्ण करता आली नाहीत. क्रिकेटच्या नियमांनुसार गोलंदाजी करणाऱ्या संघाने निर्धारित वेळेत सर्व षटके पूर्ण करणे आवश्यक असते. नियमांचे उल्लंघन झाल्यानंतर सामनाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
या सामन्यात अक्षर पटेलने स्वतः गोलंदाजी केली नाही. फिरकीपटू असूनही त्याने एकही षटक टाकले नाही आणि पूर्णपणे जलदगती गोलंदाजांवर भर दिला. त्यामुळे षटकांचा वेग मंदावला आणि अखेर संघावर दंडाची कारवाई झाली.
गोलंदाजीत न दिसलेला अक्षर फलंदाजीत मात्र संघासाठी संकटमोचक ठरला. २११ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात खराब झाली होती. अशा कठीण वेळी त्याने डेविड मिलर सोबत महत्त्वाची भागीदारी करत अवघ्या ३० चेंडूंमध्ये ५६ धावांची दमदार खेळी केली.
त्यानंतर अशोतोष शर्मा आणि माधव तिवारी यांनी आक्रमक फलंदाजी करत दिल्लीला १९ षटकांत विजय मिळवून दिला.
या विजयामुळे दिल्ली संघाच्या पुढील फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. मात्र पुढील टप्प्यात स्थान मिळवण्यासाठी संघाला उर्वरित सामने जिंकण्यासोबत इतर संघांच्या निकालांवरही अवलंबून राहावे लागणार आहे.