
Image Source:(Internet)
अयोध्या: येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय रँकिंग कुस्ती स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू Vinesh Phogat हिने भारतीय कुस्ती महासंघावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. “माझ्याविरुद्ध पूर्वनियोजित षड्यंत्र रचले जात आहे. मला कुस्तीतून निवृत्त करणे हेच त्यांचे ध्येय आहे; मात्र मी कोणत्याही परिस्थितीत संन्यास घेणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत विनेशने सांगितले.
देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यास २६ जून २०२६ पर्यंत बंदी घालण्यात आलेली असतानाही विनेश सोमवारी गोंडा येथे दाखल झाली. तिने भारतीय कुस्ती महासंघाने पाठवलेल्या नोटिशीलाही उत्तर दिले असून, त्यानंतर महासंघाच्या भूमिकेवर सलग टीकास्त्र सोडले.
भारतीय कुस्ती महासंघाने विनेशला अपात्र ठरवताना उत्तेजक प्रतिबंधक नियमांचा आधार घेतला आहे. निवृत्तीनंतर पुन्हा स्पर्धात्मक कुस्तीत पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंना सहा महिने आधी संबंधित संस्थेला माहिती देणे आणि त्या कालावधीत उत्तेजक चाचण्यांसाठी उपलब्ध राहणे बंधनकारक असते. याच कारणावरून विनेशवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मात्र, विनेशने हा दावा फेटाळून लावत आपण युनायटेड वर्ल्ड रेसलिंग संघटनेला नियमानुसार सहा महिने आधी पुनरागमनाची माहिती दिली होती, असे स्पष्ट केले. “मी सर्व नियम आणि अटी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे माझ्यावर करण्यात आलेली कारवाई अन्यायकारक आहे,” असा युक्तिवाद तिने केला.
दरम्यान, विनेशच्या स्पष्टीकरणावर भारतीय कुस्ती महासंघ समाधानी नसल्याचे सूत्रांनी सांगितले. “तिने केवळ पात्रतेच्या मुद्द्यावर उत्तर दिले आहे. शिस्तभंगाच्या सुनावणीचा निर्णय होईपर्यंत तिला स्पर्धेत सहभागी होता येणार नाही,” असे महासंघाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
महिला कुस्तीपटूंच्या रँकिंग स्पर्धेसाठी वजन मोजमाप सोमवारी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान होणार असून, मुख्य स्पर्धा मंगळवारी पार पडणार आहे.