मोदींच्या आवाहनानंतर राज्यात चिंता वाढली; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा किती साठा शिल्लक? छगन भुजबळांनी दिली माहिती

    12-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसची बचत करण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यात इंधन साठ्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री Chhagan Bhujbal यांनी राज्यातील इंधन साठ्याची माहिती जाहीर करत नागरिकांना काटकसरीचे धोरण अवलंबण्याचे आवाहन केले आहे.

भुजबळ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या सूचनेचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. देशातील अनेक भाग पेट्रोल आणि इंधनावर अवलंबून असून आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा त्यावर परिणाम होत आहे. विशेषतः होर्मूजच्या खाडीत सुरू असलेल्या घडामोडींवर पुढील परिस्थिती अवलंबून असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील सध्याच्या इंधन साठ्याबाबत माहिती देताना भुजबळ यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सध्या पेट्रोलचा १ लाख ५९ हजार लिटर साठा उपलब्ध आहे. डिझेलचा २ लाख ९८ हजार लिटर साठा शिल्लक असून केरोसीनचा ४ हजार किलोलीटर साठा उपलब्ध आहे. तसेच एलपीजीचा ३५ हजार किलो साठा उपलब्ध असल्याची माहिती त्यांनी दिली.

काही दिवसांपूर्वी हॉटेल आणि इतर वापरावर निर्बंध होते, ते हळूहळू शिथिल करण्यात आले. मात्र आता परिस्थिती लक्षात घेता इंधनाचा वापर जपून करण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्यातील नागरिकांनी विनाकारण इंधनाचा वापर टाळावा, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे आणि आवश्यक तेवढाच एलपीजीचा वापर करावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.