
Image Source:(Internet)
नागपूर : दक्षिण चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय टॉलिवूड अभिनेता आणि युट्युबर भारत कांत याचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्याचा जवळचा मित्र आणि सिनेमॅटोग्राफर साई त्रिलोक याचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे टॉलिवूडसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारत कांत आणि साई त्रिलोक हे दोघे आंध्र प्रदेशातील नेल्लोरहून हैदराबादकडे परतत होते. शनिवारी मध्यरात्रीनंतर त्यांनी प्रवास सुरू केला होता. पहाटेच्या सुमारास पेड्डा अंबरपेट परिसरातील ‘ओआरआर’ मार्गावर त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. नानकरामगुडा येथील त्यांच्या घराकडे जात असताना 111.5 किलोमीटरच्या टप्प्यावर ही दुर्घटना घडली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात अतिवेग, रात्रभराचा प्रवास आणि चालकाला आलेली झोप ही अपघातामागील मुख्य कारणे असावीत, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अपघात इतका गंभीर होता की सुरुवातीला मृतांची ओळख पटवणे कठीण झाले होते. मात्र घटनास्थळी मिळालेल्या मोबाईल फोन आणि वाहन क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी दोघांची ओळख निश्चित केली.
या प्रकरणी आदिबातला पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
३१ वर्षीय भारत कांत हा अभिनयासोबतच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय होता. टॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याने विविध भूमिका साकारल्या होत्या. तसेच अनेक शॉर्ट फिल्म्स आणि डिजिटल कंटेंटमधून त्याने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. इन्स्टाग्राम आणि युट्युबवरही त्याचा मोठा चाहता वर्ग होता.
करिअरमध्ये यशाची नवी उंची गाठण्याआधीच झालेल्या या दुर्दैवी अपघातामुळे मनोरंजन क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.