
Image Source:(Internet)
कोकण : कोकण आणि सह्याद्रीच्या जंगलपट्ट्यात दुर्मीळ मानल्या जाणाऱ्या ब्लॅक पँथर अर्थात काळ्या बिबट्यांच्या हालचालींमध्ये गेल्या काही महिन्यांत वाढ झाल्याचे समोर आले आहे. वन विभाग आणि वन्यजीव अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार, कोकणात २५ हून अधिक काळे बिबटे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राज्याच्या जैवविविधतेला नवा आयाम मिळाल्याचे मानले जात आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही मेलेनिस्टिक लेपर्ड अर्थात काळ्या बिबट्याची नोंद झाली असून, ही नोंद वन्यजीव संवर्धनासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सह्याद्री ते कोकण हा वन्यजीवांच्या स्थलांतरासाठी महत्त्वाचा पट्टा समजला जातो. कर्नाटकातील जंगलातून तिलारी आणि आंबोली मार्गे अनेक वन्यजीव सह्याद्रीत दाखल होतात आणि पुढे कोकणात स्थलांतर करतात. या वन्यजीवांमध्ये काळ्या बिबट्यांचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ब्लॅक पँथर ही स्वतंत्र प्रजाती नसून, बिबट्याचाच एक दुर्मीळ प्रकार आहे. शरीरातील ‘मेलानिन’ रंगद्रव्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा रंग गडद काळा दिसतो. काही वेळा त्याच्या अंगावरील ठिपक्यांचा पॅटर्नही स्पष्टपणे दिसून येतो. दाट जंगल आणि सदाहरित वनांमध्ये लपण्यासाठी काळा रंग उपयुक्त ठरत असल्याने अशा भागांत त्यांचा वावर अधिक दिसतो.
वनाधिकारी सर्वर खान यांनी सांगितले की, काळे बिबटे दाट जंगलात राहणे पसंत करतात. त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण करणे ही सध्याची मोठी गरज आहे. जखमी अवस्थेत किंवा मानवी वस्तीत आलेल्या बिबट्यांची वन विभागाकडून सुरक्षित सुटका केली जाते. नागरिकांनी अशा प्राण्यांना इजा न करता तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
व्याघ्रप्रेमी अनिकेत बापट यांनी सांगितले की, कोकणातील जंगलांमध्ये काळ्या बिबट्यांचा अधिवास वाढताना दिसत आहे. मात्र अन्नाच्या शोधात हे बिबटे मानवी वस्तीकडे येऊ लागल्याने मानव-वन्यजीव संघर्षाची शक्यता वाढत आहे. त्यामुळे त्यांच्या अधिवासाचे संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी व्यापक उपाययोजना आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
वन्यजीव अभ्यासकांच्या अंदाजानुसार, कोकणात सध्या किमान १५ ते २० काळे बिबटे असावेत; मात्र ही संख्या आणखी जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर, देवरूख, लांजा, गुहागर, संगमेश्वर, दापोली आणि खेड परिसरात त्यांचा वावर लक्षणीय प्रमाणात दिसून आला आहे.
महाराष्ट्रातील ताडोबा, पेंच, नवेगाव-नागझिरा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातही काळ्या बिबट्यांच्या नोंदी झाल्या आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील कोयना, राधानगरी आणि चांदोली अभयारण्यातही त्यांचे अस्तित्व आढळले आहे.