
Image Source:(Internet)
हैदराबाद : पंतप्रधान मोदी यांनी तेलंगणातील हैदराबाद येथे विविध पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन केले. सुमारे ९,४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमुळे राज्यातील वाहतूक, ऊर्जा आणि सार्वजनिक सुविधांना मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नागरिकांना संबोधित करताना मोदी यांनी पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा वापर गरजेनुसार आणि काटकसरीने करण्याचे आवाहन केले. पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण घडामोडींमुळे जागतिक इंधन बाजारावर दबाव निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा परिस्थितीत इंधन बचत केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल आणि परकीय चलनाचा ताण कमी होईल, असे ते म्हणाले.
भारत ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असून, सौर ऊर्जा, इथेनॉल मिश्रण, सीएनजी आणि गॅस पाइपलाईन यांसारख्या पर्यायी ऊर्जास्रोतांवर केंद्र सरकार विशेष लक्ष केंद्रीत करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमात तेलंगणाचे मुख्यमंत्री Revanth Reddy यांनी विकासकामांमध्ये राजकीय मतभेद आड येऊ नयेत, अशी भूमिका मांडली. त्यावर प्रतिक्रिया देताना मोदी यांनी ‘विकसित भारत २०४७’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व राज्यांचा समतोल विकास आवश्यक असल्याचे सांगितले.
गेल्या काही वर्षांत तेलंगणात रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग आणि इतर पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करण्यात आल्याचाही उल्लेख पंतप्रधानांनी यावेळी केला.