
Image Source:(Internet)
नागपूर :जागतिक स्तरावर सुरू असलेल्या इराण-अमेरिका संघर्षामुळे सोन्या-चांदीच्या बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात सोन्याचे दर विक्रमी पातळीवर गेले होते. मात्र त्यानंतर दरात सातत्याने घसरण होत असून ग्राहकांसाठी सोने तुलनेने स्वस्त झाले आहे.
उच्चांकाच्या तुलनेत सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात खाली आल्याने अनेकांनी खरेदीकडे मोर्चा वळवला आहे. अशातच पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना काही काळ सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केल्याने सराफा बाजारात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
11 मे 2026 रोजी जाहीर झालेल्या दरानुसार मुंबईमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,52,350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी नोंदवली गेली. तर 22 कॅरेट सोन्याचा दर 1,39,650 रुपयांवर आला आहे. राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,52,500 रुपये असून 22 कॅरेट सोने 1,39,800 रुपयांना विकले जात आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत दरात किरकोळ घट झाल्याचे दिसून आले.
तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय घडामोडी, डॉलरची स्थिती आणि बाजारातील गुंतवणूकदारांची मानसिकता याचा थेट परिणाम सोन्याच्या भावावर होत आहे. त्यामुळे आगामी काळातही दरात चढउतार कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हैदराबाद येथे झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी इंधनाचा वापर मर्यादित ठेवण्याचे, परदेश प्रवास टाळण्याचे आणि आयात होणाऱ्या वस्तूंचा वापर कमी करण्याचे आवाहन केले. देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागावे, असे सांगतानाच त्यांनी सोन्याच्या खरेदीबाबतही संयम ठेवण्याचा सल्ला दिला.