
Image Source:(Internet)
मुंबई : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण पार पडले. मात्र या कार्यक्रमादरम्यान महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक वाहनचालकांना तब्बल पाच ते सहा तास वाहतुकीत अडकून राहावे लागले.
या कोंडीचा फटका सुप्रिया सुळे यांनाही बसला. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत खंडाळा घाट परिसरातील वाहतुकीची बिकट स्थिती दाखवून दिली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सार्वजनिकरित्या दिलगिरी व्यक्त केली आहे.
“आज काही प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला, त्याबद्दल मी मनापासून माफी मागतो. या प्रकल्पासाठी सुमारे ७ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला असून भविष्यात प्रवास अधिक सुलभ होणार आहे,” असे फडणवीस यांनी सांगितले.
तसेच सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत त्यांनी म्हटले की, “त्या देखील आज कोंडीत अडकल्या होत्या. मात्र आता ही समस्या कायमची दूर होईल. पुढील काळात मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होईल.”
मुंबई–पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. तथापि, उद्घाटनाच्या दिवशीच निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण होते. सलग सुट्ट्यांमुळे प्रवासी मोठ्या संख्येने बाहेर पडल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली होती.
खंडाळा घाटासह अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. उष्णतेमुळे काही वाहनांमध्ये बिघाड झाल्याच्या घटनाही समोर आल्या. परिणामी, प्रवाशांना दीर्घकाळ अडकून राहावे लागले.