
Image Source:(Internet)
अहिल्यानगर : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. आमदार रोहित पवार यांच्या ताज्या वक्तव्यामुळे या चर्चांना नवे इंधन मिळाले आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. यासंदर्भात काही बैठका, फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र, प्रत्यक्षात कोणताही ठोस निर्णय झाला नाही.
एकत्र येण्याची अट स्पष्ट-
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत मतदारसंघात आंदोलनादरम्यान बोलताना रोहित पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “अजित पवार यांच्या गटाने भाजपची साथ सोडली, तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
त्यांनी पुढे असा सवालही उपस्थित केला की, “भाजपसोबत सत्तेत राहून एकत्र येणे शक्य आहे का?” यावरून सत्ताधारी महायुतीत राहायचे की महाविकास आघाडीकडे वळायचे, हा मुख्य वादाचा मुद्दा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बारामतीत ‘पवार विरुद्ध पवार’ टळणार?
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. पवार कुटुंबीयांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यात यशही आले. त्यामुळे ‘पवार विरुद्ध पवार’ अशी थेट लढत टळली.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी भविष्यात ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होऊ नये, अशी भूमिका मांडली होती. मात्र, याच मुद्द्यावर रोहित पवार यांनी वेगळीच भूमिका घेत, भाजपसोबतची युती कायम राहिल्यास आगामी निवडणुकांत अशी लढत होऊ शकते, असे संकेत दिले.
राजकारणात पुन्हा समीकरणे बदलणार?
रोहित पवार यांच्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय समीकरणांबाबत पुन्हा एकदा तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी गटांमधील मतभेद अजूनही कायम असले, तरी योग्य वेळी राजकीय परिस्थितीनुसार निर्णय होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकूणच, भाजपसोबतची युती हा कळीचा मुद्दा ठरत असून, त्यावरच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या भवितव्याचा निर्णय अवलंबून असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.