
Image Source:(Internet)
नागपूर : शहरात दारूसोबतच अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवण्याचे प्रकार वाढत असल्याने पोलिसांनी आता अशा चालकांविरोधात कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. यासाठी वाहतूक पोलिसांना अत्याधुनिक ‘ड्रग टेस्टिंग किट्स’ उपलब्ध करून देण्यात आले असून, या किट्सच्या साहाय्याने चालकाने कोणत्या प्रकारची नशा केली आहे, हे थेट घटनास्थळीच ओळखता येणार आहे.
महाराष्ट्र दिनापासून या विशेष मोहिमेला सुरुवात झाली असून, नशेत वाहन चालवणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी शहर पोलीस सक्रिय झाले आहेत. आतापर्यंत मद्यधुंद चालकांना पकडण्यासाठी ब्रेथ अॅनालायझरचा वापर केला जात होता. मात्र, ड्रग्सच्या वाढत्या वापरामुळे नेमकी कोणती नशा केली आहे, हे त्वरित ओळखणे कठीण जात होते. आता नव्या किट्समुळे ही अडचण दूर होणार आहे.
या चाचणीमध्ये चालकाच्या लाळेचा नमुना घेतला जाणार असून, त्यातून नशेची पातळी आणि प्रकार समजू शकणार आहे. त्यानुसार संबंधितांवर एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.
या मोहिमेचा शुभारंभ पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या हस्ते करण्यात आला. सध्या पोलिसांकडे दोन ड्रग टेस्टिंग किट्स उपलब्ध असून, भविष्यात त्यांची संख्या वाढविण्याचा मानस आहे. ‘ऑपरेशन यू-टर्न’च्या धर्तीवर ही मोहीम राबवली जात असून, अमली पदार्थांच्या गैरवापराविरोधात पोलिसांची ही मोठी पावले मानली जात आहेत.
यावेळी सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, मनपा आयुक्त विपिन इटणकर, उपायुक्त लोहित मतानी, निकेतन कदम, नित्यानंद झा, ऋषिकेश सिंगा रेड्डी, दीपक अग्रवाल आदी अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, ‘सेव्ह लाईफ फाऊंडेशन’ने आपल्या सीएसआर उपक्रमांतर्गत ही अत्याधुनिक उपकरणे पोलिसांना प्रदान केली असून, संस्थापक पियुष तिवारी यांनीही या मोहिमेत सहभाग नोंदवला.
नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करताना पोलिसांनी स्पष्ट केले की, नशेत वाहन चालवणे हे स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाला धोका ठरू शकते.