साताऱ्यात डिजिटल जनगणना २०२७चा शुभारंभ; स्व-गणनेसाठी नागरिकांना पुढाकार घेण्याचे आवाहन

    01-May-2026
Total Views |
Image Source:(Internet)

सातारा : देशाच्या विकासाला दिशा देणारी २०२७ ची जनगणना यंदा अत्याधुनिक डिजिटल स्वरूपात राबवली जात असून, सातारा जिल्ह्यात या उपक्रमाची अधिकृत सुरुवात आज करण्यात आली. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आपल्या ‘कोयना दौलत’ निवासस्थानी स्वतः ऑनलाइन ‘स्व-गणना’ करत या मोहिमेचा प्रारंभ केला.

“आपली जनगणना, आपला विकास” या संकल्पनेवर आधारित या प्रक्रियेत नागरिकांना स्वतःची माहिती थेट डिजिटल पोर्टलवर नोंदवण्याची सुविधा देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात घरांची नोंदणी आणि घरगणना केली जाणार असून, देसाई यांनी ३३ प्रश्नांची उत्तरे देत नोंदणी पूर्ण केली आणि त्यांना ११ अंकी ‘SE ID’ मिळाला.

यावेळी त्यांनी सांगितले की, जनगणना ही केवळ आकडेवारी गोळा करण्यापुरती मर्यादित नसून भविष्यातील धोरणनिर्मिती आणि विकास नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यामुळे नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेत या डिजिटल प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे त्यांनी आवाहन केले.

१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने माहिती सादर करता येणार आहे. मोबाईलवर येणाऱ्या OTPच्या सहाय्याने नोंदणी सुलभ करण्यात आली असून, नकाशावर घराचे अचूक स्थान निश्चित करण्याची सोयही उपलब्ध आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर मिळणारा ‘SE ID’ जतन करून ठेवावा आणि प्रगणक भेट देईल तेव्हा तो दाखवावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जनगणना ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याने या डिजिटल उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन देसाई यांनी केले.