उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा कडक निर्णय; पुणे शिवसेना कार्यकारिणी बरखास्त, नव्या रणनीतीचे संकेत

    09-Apr-2026
Total Views |
 
Eknath Shinde
 Image Source:(Internet)
पुणे :
महाराष्ट्रात पुढील काही वर्षांत मोठ्या निवडणुका नसल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आता संपूर्ण लक्ष पक्ष संघटन मजबूत करण्यावर केंद्रित केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या ऑनलाइन बैठकीत त्यांनी नवनियुक्त संपर्क प्रमुख आणि विभागीय पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत स्पष्ट इशारा दिला की, पक्षात केवळ सक्रिय आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच स्थान दिले जाईल.
 
बैठकीत शिंदे यांनी ठाम शब्दांत सांगितले की, पदावर असूनही कामगिरी न करणाऱ्यांना तात्काळ पदमुक्त केले जाईल. मंत्री, खासदार किंवा आमदार असला तरी प्रत्येकाने ‘कार्यकर्ता’ म्हणूनच काम केले पाहिजे, असा कडक संदेश त्यांनी दिला. संघटना वाढवायची असेल, तर केवळ कार्यालयात बसून नव्हे तर थेट जनतेत जाऊन काम करणे आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.
 
संख्येपेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देण्याची भूमिका त्यांनी मांडत, फक्त पद किंवा निधीसाठी पक्षात येणाऱ्यांना दूर ठेवण्याचे संकेत दिले. मेहनती आणि निष्ठावान कार्यकर्त्यांनाच पुढे संधी आणि जबाबदाऱ्या दिल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
 
या धोरणाचा पहिला ठोस परिणाम पुण्यात दिसून आला आहे. संघटनात्मक कमकुवतपणा आणि निष्क्रियतेमुळे पुणे शहरातील संपूर्ण शिवसेना कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील काही काळातील कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
 
या निर्णयामुळे राज्यभरातील पदाधिकाऱ्यांना स्पष्ट संदेश गेला आहे की, केवळ पद धारण करून चालणार नाही, तर सक्रियपणे काम करणे अनिवार्य आहे. अन्यथा कारवाई अटळ आहे. शिंदे यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आगामी काळात शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.