कळमन्यात मध्यरात्रीचा थरारक अपघात; उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली, दोघांचा मृत्यू

    08-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नागपूर : शहरातील कळमना परिसरात उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर आणखी दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी काळमना पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (७ एप्रिल) रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास लक्ष्मीनगर चौकाजवळ ही दुर्घटना घडली. लग्नसमारंभ आटोपून चार जण एकाच दुचाकीवरून परतत होते. दरम्यान, दुचाकीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आयशर ट्रकवर मागून जोरात धडकली.

या धडकेत दुचाकी चालक सूरज भगवान रात्रे (२२) आणि सोबत असलेले बलवंत बंजारे (अंदाजे ५०) गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. उर्वरित दोघे जखमी असून त्यांच्यावर शहरातील ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर जखमींना तत्काळ भावनी आणि मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. प्राथमिक तपासात संबंधित ट्रक निष्काळजीपणे रस्त्यावर उभा केल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला असून मोटार वाहन कायद्यांतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.