
Image Source:(Internet)
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात शालेय सहलींच्या माध्यमातून मोठी आर्थिक झेप घेतली आहे. सुमारे २५ हजार ५५८ बस फेऱ्यांद्वारे लाखो विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी पार पाडताना एसटीने तब्बल १२७ कोटी १८ लाख रुपयांचा महसूल कमावला आहे. हा आकडा मागील वर्षाच्या तुलनेत ३३ कोटी २९ लाखांनी अधिक असल्याने महामंडळासाठी ही उल्लेखनीय कामगिरी ठरली आहे.
परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सुरक्षित सहलींसाठी एसटी हा सर्वात विश्वासार्ह पर्याय आहे. शैक्षणिक वर्षात शाळा आणि महाविद्यालयांकडून धार्मिक तसेच ऐतिहासिक स्थळांच्या सहली मोठ्या प्रमाणावर आयोजित केल्या जातात, आणि या सहलींसाठी एसटी सेवा महत्त्वाची भूमिका बजावते.
सरकारकडून एसटीद्वारे आयोजित सहलींवर ५० टक्के सवलत दिली जात असल्यामुळे या प्रवासाला अधिक प्राधान्य दिले जात आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या योजनेचा मोठा फायदा होत असून, सुरक्षित आणि परवडणारा प्रवास उपलब्ध होत आहे.
यंदा एसटीने शालेय सहलींसाठी नवीन आणि आधुनिक बसांची व्यवस्था केल्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक आरामदायी आणि सुरक्षित झाला असल्याचेही सरनाईक यांनी नमूद केले.
येत्या शैक्षणिक वर्षात शाळा व महाविद्यालयांनी खासगी बसांऐवजी एसटी सेवेला अधिक प्राधान्य द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.