MPSC निकाल जाहीर; सोलापूरचा विजय राज्यात अव्वल, मुलींमध्ये आरती पहिली

    08-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ चा अंतिम निकाल अखेर जाहीर झाला असून यंदा सोलापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात बाजी मारली आहे.

२७ ते २९ मे २०२५ दरम्यान पार पडलेल्या या मुख्य परीक्षेचा निकाल आज, ८ एप्रिल २०२६ रोजी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला.

या निकालात सोलापूर जिल्ह्यातील विजय नागनाथ लामकाने (बैठक क्रमांक PN004038) यांनी सर्वसाधारण तसेच मागासवर्गीय गटातून राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर आरती परमेश्वर जाधव (बैठक क्रमांक PN007031) यांनी मुलींमध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळवत विशेष यश संपादन केले आहे.

यंदाच्या निकालानुसार विविध २० संवर्गांतील एकूण ४६१ पदांसाठी उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. यशस्वी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

आयोगाने उमेदवारांच्या माहितीसाठी संपूर्ण निकालासोबत प्रत्येक प्रवर्गातील शेवटच्या उमेदवाराचे सीमांकन गुण (कट-ऑफ) देखील संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहेत. मात्र, या शिफारशी उमेदवारांनी आवेदनपत्रात दिलेल्या माहितीच्या पडताळणीच्या अधीन राहणार आहेत. नियुक्तीवेळी मूळ कागदपत्रांची तपासणी केली जाईल. माहिती चुकीची किंवा अपूर्ण आढळल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होऊ शकते, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, वैद्यकीय तपासणी पूर्ण न केलेल्या उमेदवारांचा अंतिम निकालात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच समांतर आरक्षण आणि इतर मुद्द्यांवर न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहूनच हा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

मुंबई उच्च न्यायालयातील रिट याचिका क्र. १७४६/२०२६ संदर्भातील आदेशानुसार काही उमेदवारांचा निकालात समावेश करण्यात आला असला, तरी प्रशासकीय कारणास्तव त्यांची शिफारस अद्याप राखून ठेवण्यात आली आहे.

तसेच दिव्यांग, अनाथ, खेळाडू आणि मागास प्रवर्गासाठी आरक्षित पदांवरील शिफारसी सक्षम प्राधिकरणाकडून अंतिम पडताळणीनंतरच निश्चित केल्या जाणार आहेत.