चंद्रपुरात डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे मधमाश्यांचा हल्ला; क्रिकेट मैदानावर एकाचा मृत्यू, अनेक जखमी
08-Apr-2026
Total Views |

Image Source:(Internet)
चंद्रपूर : जिल्ह्यातील एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान डीजेच्या मोठ्या आवाजामुळे मधमाश्यांचा थवा भडकला आणि त्यांनी मैदानावर उपस्थितांवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारात एका वृद्धाचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, क्रिकेट सामना सुरू असताना मैदानावर जोरात डीजे वाजवण्यात येत होता. या कर्णकर्कश आवाजामुळे जवळच असलेले मधमाश्यांचे पोळे हलले आणि मधमाश्या आक्रमक झाल्या. काही क्षणांतच मोठ्या संख्येने मधमाश्यांनी मैदानावर धाव घेत उपस्थित खेळाडू व प्रेक्षकांवर हल्ला चढवला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे मैदानावर एकच गोंधळ उडाला. लोकांनी जीव वाचवण्यासाठी पळापळ केली. या घटनेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेनंतर स्थानिक प्रशासन आणि आयोजकांवर सुरक्षेच्या दृष्टीने निष्काळजीपणाचा ठपका ठेवला जात आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.