गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती दाखवत सायबर फसवणूक; मोबाईल हॅक करून १०.३० लाखांची लूट

    08-Apr-2026
Total Views |
Image Source:(Internet)

नवी मुंबई : सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची नवी पद्धत अवलंबत गॅस कनेक्शन तोडण्याची धमकी देऊन नागरिकांना गंडा घालण्याचे प्रकार वाढले आहेत. कोपर खैराणे परिसरात अशाच प्रकारात एका व्यक्तीकडून तब्बल १०.३० लाख रुपये लाटण्यात आले.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घणसोली येथील रहिवाशाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला महानगर गॅस कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगत गॅस बिल थकले असल्याचे कारण देत कनेक्शन बंद करण्याची धमकी दिली.

या भीतीमुळे संबंधित व्यक्तीने ऑनलाइन बिल भरण्यास सहमती दर्शवली. त्यानंतर आरोपींनी दुसऱ्या क्रमांकावरून एक फाईल पाठवून ती डाउनलोड करण्यास सांगितले. फाईल डाउनलोड करताच मोबाईलमध्ये मालवेअर ॲप इन्स्टॉल झाले आणि आरोपींनी फोनवरील नियंत्रण मिळवले.

यानंतर त्यांनी पीडिताच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने १०.३० लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळते केले. खात्यातून पैसे वजा झाल्याचे लक्षात येताच पीडिताने तत्काळ कोपर खैराणे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून सायबर पथकाच्या मदतीने तपास सुरू केला आहे.