
Image Source:(Internet)
पुणे: राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत शिक्षण संचालनालयाने मोठा दिलासा दिला आहे. जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी मार्च २०२६ च्या वेतनासह देण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी जारी केले आहेत.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथील शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबतचे अधिकृत आदेश मंगळवारी (७ एप्रिल) सर्व शिक्षणाधिकारी व संबंधित विभागांना पाठवले.
या आदेशानुसार, राज्यातील पात्र शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना थकित महागाई भत्त्याची रक्कम मार्च महिन्याच्या वेतनासोबत अदा केली जाणार आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या भत्त्याबाबतची प्रतीक्षा अखेर संपणार आहे.
तसेच, ज्या जिल्ह्यांमध्ये फेब्रुवारी २०२६ चे वेतन कोषागारामार्फत आधीच पारित झाले आहे, त्या जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी २०२६ या एका महिन्याच्या महागाई भत्त्यातील फरक देखील मार्चच्या वेतनात समाविष्ट करून देण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार असून, प्रलंबित देयकांबाबतचा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.