नागपुरात खळबळ!तब्बल ५० जिलेटिन कांड्यासह ५० डेटोनेटर जप्त

    07-Apr-2026
Total Views |
 
Gelatin sticks
 Image Source:(Internet)
नागपूर :
शहरातील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या दोसार चौक परिसरात मंगळवारी सकाळी मोठी धक्कादायक घटना उघडकीस आली. बेवारस अवस्थेत ठेवलेला स्फोटकांचा साठा पोलिसांच्या हाती लागला असून, घटनास्थळावरून तब्बल ५० जिलेटिन कांड्या (Gelatin sticks) आणि ५० डेटोनेटर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकारामुळे सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली आहे.
 
प्राथमिक तपासातून या स्फोटकांचा संबंध स्फोटक निर्मिती करणाऱ्या एका कंपनीशी असू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. काटोल भागात नुकत्याच घडलेल्या स्फोटाच्या घटनेनंतर या प्रकरणाकडे अधिक गांभीर्याने पाहिले जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही.
 
संवेदनशील परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके आढळल्याने तपास यंत्रणांसमोर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. हे साहित्य येथे कोणी आणि कशासाठी आणून ठेवले? यामागे कोणती घातपाताची योजना होती का? या सर्व शक्यतांचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
 
घटनेनंतर परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, संशयास्पद हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, संभाव्य संशयितांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत. नागरिकांनीही सतर्क राहून कोणतीही संशयास्पद बाब त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.