अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबावर काळाचा घाला; अन्नातून विषबाधेचा संशय

Image Source:(Internet)
अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद शहरातील चांदखेडा परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. डोसा खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील दोन लहान मुलींचा मृत्यू झाला असून त्यांच्या आई-वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिलच्या रात्री कुटुंबप्रमुख विमल यांनी घराजवळील आयओसी रोडवरील एका डेअरीमधून डोशाचे पीठ खरेदी केले होते. त्या रात्री कुटुंबाने डोसे बनवून खाल्ले आणि दुसऱ्या दिवशी उरलेल्या पिठाचाही वापर करण्यात आला. त्यानंतर सर्वांना उलट्या आणि तब्येतीच्या तक्रारी जाणवू लागल्या. परिस्थिती गंभीर होताच कुटुंबातील सदस्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान दोन निष्पाप जीवांचा अंत या कुटुंबात पती-पत्नी आणि त्यांच्या तीन महिन्यांच्या व चार वर्षांच्या दोन मुली होत्या. उपचार सुरू असताना ४ एप्रिल रोजी तीन महिन्यांच्या बालिकेचा मृत्यू झाला, तर ५ एप्रिलला चार वर्षांच्या मुलीनेही प्राण सोडले. आई-वडिलांची प्रकृती अजूनही गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
अन्न नमुन्यांची तपासणी सुरू या घटनेनंतर महानगरपालिकेच्या अन्न विभागाने तत्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणाहून डोशाच्या पिठाचे नमुने गोळा केले आहेत. पोलिसांच्या उपस्थितीत नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, चांदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मृत मुलींचे शवविच्छेदनही करण्यात आले आहे.
डेअरी मालकाचा आरोपांवर इन्कार दरम्यान, संबंधित डेअरीचे मालक केतनभाई यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी सांगितले की, त्या दिवशी मोठ्या प्रमाणात पीठ विक्री झाली होती, मात्र इतर कोणत्याही ग्राहकाकडून तक्रार आलेली नाही. काही ग्राहकांशी संपर्क साधल्यानंतरही कोणालाही त्रास झाला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नेमके कारण काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.