
Image Source:(Internet)
बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी झालेल्या मेळाव्यात सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी दिवंगत नेते ‘दादा’ यांच्या आठवणींना उजाळा देताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
“केवळ दोन महिन्यांपूर्वी आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्याला गमावलं. बारामतीत पोटनिवडणूक होईल, असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. दादा आज आपल्यात नाहीत, हे मन मानायलाच तयार नाही,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
त्या पुढे म्हणाल्या, “दादांचं जाणं ही फक्त आमच्या कुटुंबाची नाही, तर संपूर्ण बारामती, महाराष्ट्र आणि देशाची हानी आहे. बारामती दादांसाठी आईसारखी होती, आणि इथला प्रत्येक नागरिक त्यांच्यासाठी पांडुरंग होता.”
“बारामती म्हणजे दादांचा श्वास होता, म्हणूनच त्यांचा अखेरचा श्वासही याच मातीत विसावला,” असं म्हणताच सभागृहात क्षणभर शांतता पसरली आणि सुनेत्रा पवार यांचा आवाज भरून आला.
बारामतीशी असलेलं दादांचं नातं सांगताना त्या म्हणाल्या, “या मातीतल्या प्रत्येक झाडात, प्रत्येक रस्त्यात, शाळेत आणि इमारतीत दादांचा स्पर्श आहे. आजही सगळं वातावरण त्यांच्या आठवणीने भरून गेलं आहे.”
आपल्या दु:खावर मात करत जनतेसाठी पुढे येण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. “हे दु:ख मनात दडवून मी तुमच्यासमोर उभी आहे. तुमचं प्रेम आणि पाठिंबा हाच माझा आत्मविश्वास आहे,” असं त्या म्हणाल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून मिळालेल्या जनतेच्या पाठिंब्याची आठवण करून देत त्यांनी सांगितलं, “दादांना तुम्ही नेहमीच प्रचंड मताधिक्क्याने निवडून दिलं. ही निवडणूक केवळ राजकीय नाही, तर दादांना वाहिलेली श्रद्धांजली आहे.”
बारामतीच्या विकासाचा वारसा पुढे नेण्याचा शब्द देताना त्यांनी स्पष्ट केलं, “पवारसाहेबांनी दिलेल्या दृष्टीकोनाला दादांनी आपल्या कष्टाने आकार दिला. बारामतीला जागतिक पातळीवर नेण्याचं त्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार.”
“दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. पण त्यांच्या स्वप्नांसाठी, बारामतीकरांच्या सेवेसाठी मी आयुष्य झोकून देईन,” असा ठाम विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.