ग्रंथपाल-शारीरिक शिक्षण संचालकांचाही समावेश

राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. विविध विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्यास शासनाने मंजुरी दिली असून, यासोबतच ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालकांच्या पदभरतीलाही परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील परिपत्रक पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राज्यभरातील सुमारे ५५०० सहाय्यक प्राध्यापक पदांची भरती लवकरच सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही भरती १ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या विद्यार्थी संख्येच्या आधारावर केली जाणार असून, महाविद्यालयांना विषयनिहाय पदांची माहितीही कळविण्यात आली आहे.
दरम्यान, केवळ प्राध्यापक पदांपुरते मर्यादित न राहता ग्रंथपाल आणि शारीरिक शिक्षण संचालक पदांचाही समावेश करण्यात आल्याने शिक्षण संस्थांना एकत्रित रोस्टर तपासणी करणे अनिवार्य ठरणार आहे. या प्रक्रियेत तिन्ही संवर्गांची बिंदू नामावली तयार करून आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
मागासवर्ग कक्षाच्या मार्गदर्शनानुसार एकत्रित रिक्त पदांचे आणि प्रत्यक्ष भरण्यात येणाऱ्या पदांचे आरक्षण स्वतंत्रपणे निश्चित केले जाणार आहे. यासाठी शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या निर्णयांचा आधार घेणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
पुणे विभागीय कार्यालयाने पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यांतील ग्रंथपाल व शारीरिक शिक्षण संचालक पदांची अद्ययावत माहितीही उपलब्ध करून दिली आहे. १ ऑक्टोबर २०२५ रोजी मंजूर, भरलेली आणि रिक्त असलेली पदे यांचा तपशील देण्यात आल्याने रोस्टर तपासणी प्रक्रिया सुलभ होणार आहे.
रोस्टर तपासणी पूर्ण झाल्यानंतरच रिक्त पदांची अधिकृत संख्या जाहीर होणार असून, त्यानुसार भरती प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे उच्च शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.